वरकुटे पाटी येथे भरधाव कंटेनरने बाप-लेकीला चिरडले : लेकीचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी
रेडा- पुणे-सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी (ता. इंदापूर) येथे विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वारावरील चालक व त्यांची अडीचवर्षीय मुलगी हे दोघे ही खाली कोसळले. या अपघाता बालिकेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. घटनाघल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्ग तब्बल एक तास रोखून धरल्याने महामार्गाच्या दुतर्फा मोठी वाहतूककोंडी झाली होती. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.
श्रद्धा शिवाजी गायकवाड (वय अडीच वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. तर शिवाजी आत्माराम गायकवाड असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, महामार्गावर पुण्यूाकडून सोलापूरकडे कंटेनर (एचआर 38 व्ही 7408) हा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला त्याने जोरात धडक दिली. यामुळे श्रद्धा व शिवाजी हे बापलेक रस्त्यावर पडले. प्रकार नागरिकांना लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कंटेनरचालक कंटेनरसोडून फरार झाला. अपघातात गायकवाड यांना डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इंदापूर येथे उपचार सुरू आहेत. तर घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्ग रोखून धरल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर घटनास्थळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मधूकर पवार यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस हवालदार शिरीष लोंढे करीत आहे.
- उड्डाणपूल उभारण्याची मागणी
वरकुटे पाटी येथे राष्ट्रीय महामार्ग झाले पासून उड्डाणपुलाची मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सातत्याने केली होती यासाठी अनेक आंदोलने देखील झाली; मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेत नाही. त्यातच आज चिमुरडीचा जीव गेल्याने संतप्त नागरिकांनी जोपर्यंत प्रशासन उड्डाणपूल उभारण्यात बाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत रस्ता रोको बंद करायचा नाही असा निश्चय करून महामार्ग रोखला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत नागरिकांची समजून काढल्यानंतर जवळपास एकतासानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.