ZP Election : इंदापूर तालुक्यातील काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन विलासराव वाघमोडे यांनी थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटाला मोठा हादरा बसला असून माजी सहकार मंत्री व ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील राजकीय आव्हान अधिक तीव्र झाले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून इंदापूर तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले विलासराव वाघमोडे यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व व्हाइस चेअरमन, दूधगंगा संस्थेचे संचालक तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी उभारलेला भक्कम जनसंपर्क आजही प्रभावी मानला जातो. दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ‘घड्याळ’ या चिन्हावर एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयात स्थानिक कार्यकर्ते आणि जुने निष्ठावंत डावलले गेल्याची भावना अनेक गावांतून पुढे आली. या नाराजीतूनच काटी-लाखेवाडी परिसरातील १५ ते १६ गावांतील कार्यकर्त्यांनी विलासराव वाघमोडे यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची मागणी लावून धरली. ही संधी साधत भाजपने तात्काळ आक्रमक पावले उचलली. भाजपचे नेते प्रदीपदादा गारटकर, प्रवीण माने तसेच सोनई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या पुढाकाराने वाघमोडेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काटी-लाखेवाडी मतदारसंघात भाजपने वाघमोडेंना ‘हुकमी’ उमेदवार मानत पूर्ण ताकदीने प्रचारयंत्रणा मैदानात उतरवली आहे. काटी-रेडणी येथे प्रचाराचा जोरदार शुभारंभ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपकडून राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांच्या प्रचार दौऱ्यांच्या हालचालीही सुरू झाल्या असून हा मतदारसंघ आता राज्यपातळीवरील हाय-व्होल्टेज लढत ठरत आहे. अनुभवी नेते विलासराव वाघमोडेंची भाजपमधील एन्ट्री, घड्याळ चिन्हाच्या निर्णयावरून उफाळलेली नाराजी आणि भाजपची आक्रमक प्रचारयंत्रणा यामुळे काटी-लाखेवाडी मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे येथील निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.