पिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीला एका वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे इच्छुकांनी आत्तापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनीही इच्छा व्यक्त केली असून पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढवू, असेही लांडे यांनी स्पष्ट केले. तर शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही लांडे यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा रंगली आहे.
गुरूवारी (दि.1) माजी आमदार लांडे यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त लांडे यांच्या समर्थकांनी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली असून “भावी खासदार” अशा आशयाचा मजकूर आणि लोकसभेचे छायाचित्र टाकले आहे. त्यामुळे शिरूरमधून राष्ट्रवादीचेच डॉ. अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार असताना लांडे यांना “भावी खासदार” असे संबोधल्याने राजकीय वतुर्ळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. तसेच विलास लांडे यांनी आपल्याला पक्षाने तिकिट दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा 58 हजार 483 मतांनी पराभव केला होता. गेल्या काही महिन्यांपासून खासदार कोल्हे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्याही चर्चा सुरू होत्या. मात्र, आपले भाजपच्या कोणत्याही नेत्याशी बोलणे झाले नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या एका गोटात मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विलास लांडे, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा
सुरू आहे.
राष्ट्रवादीकडून मतदारसंघानुसार आढावा
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची राज्यात महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची मतदार संघानुसार चाचपणी, आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत दोन दिवस 22 लोकसभा मतदार संघातील उमेदवारांबाबत नावांची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. शिरूर लोकसभेच्या इच्छुकांची देखील चाचपणी केल्याची चर्चा आहे.
डॉ. अमोल कोल्हे काय करणार?
विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओ प्रसारित केला असून राजकारणात कोणालाही महत्वकांक्षा असणे गैर नसून लांडे यांना आपल्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा, असे म्हटले आहे. तसेच थेट डॉ. कोल्हे यांनीच लांडे यांना शुभेच्छा दिल्याने डॉ. कोल्हे हे पुढील लोकसभेची निवडणूक लढविणार की नाही? या चर्चांनी जोर धरला आहे. डॉ. कोल्हे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक अफवा पसरत आहेत. काहींच्या मते डॉ. कोल्हे भाजपात जाणार आहेत, तर काहींच्या मते त्यांना लोकसभेऐवजी विधानसभेत जाण्यात अधिक रस आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे लोकसभा निवडणूक लढविणार की विधानसभा? विधानसभा लढविल्यास कोणत्या मतदारसंघातून लढणार अशा अनेक चर्चा जोर धरत आहेत.