लांडेंना कॉंग्रेसची नकारघंटा

“पुरस्कृत’ उमेदवाराला पाठिंबा नाही – सचिन साठे

पिंपरी – विरोधकांसह सर्वपक्षीयांची मोट बांधण्यासाठी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या विलास लांडे यांना विरोधकांची (छुपी) साथ मिळणे दुरापस्त झालेले असतानाच आता महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची घोषणा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज पत्रकाद्वारे केली.

महाआघाडीच्या सदस्य पक्षांचा आपल्याला पाठिंबा मिळेल, या अपेक्षेने अर्ज दाखल करणाऱ्या विलास लांडे यांचा सध्या मोठ्या प्रमाणात अपेक्षाभंग होताना दिसत आहे. एकीकडे पुरस्कृत करुनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसकडून आपण पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट घोषणा गुरुवारी करण्यात आली.

कॉंग्रेसने याबाबत काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पिंपरीमध्ये उमेदवारी दिलेले माजी आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचा पाठिंबा दिला आहे. परंतु, चिंचवड व भोसरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना कॉंग्रेसचा पाठिंबा नसल्याचे जाहीर केले आहे. बुधवारी (9 ऑक्‍टोबर) अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने परस्पर “पुरस्कृत’ उमेदवार जाहीर केले आहेत. हे आम्हाला कदापि मान्य नाही.

याबाबत अद्यापही प्रदेश कॉंग्रेसकडून शहर कॉंग्रेसला काही आदेश नाहीत, असे पत्रक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सचिन साठे यांनी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आघाडी धर्माचे पालन करावे. परस्पर उमेदवार पुरस्कृत करण्यापूर्वी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्‍यक होते. तसे न करता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुरस्कृत उमेदवारांची घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीबाबत सुरु असणाऱ्या शहरातील घडामोडींविषयी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. उल्लेखनीय बाब अशी की, भोसरी विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे आणि पराभव याच्यातील अंतर जवळपास कॉंग्रेसच्या मतांइतकेच आहे. यामुळे कॉंग्रेसने साथ सोडल्यास लांडे यांच्या अडचणी वाढण्याचीच शक्‍यता आहे.

एकीकडे महायुती एकजूट होऊन कामाला लागलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पक्षाचे तिकीट नाकारुन अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विलास लांडे मात्र एकाकी पडताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत महेश लांडगे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. अपक्ष म्हणून लढत असतानाही त्यांना 60,173 मते मिळाली होती आणि सुमारे 15 हजारांच्या मताधिक्‍याने लांडगे निवडून आले होते. तर पराभूत झालेल्या लांडे यांना 44211 मते मिळाली होती. कॉंग्रेसच्या हनुमंत भोसले यांनी 14363 मते घेतल्याने लांडे पराभूत झाले होते. आता पुन्हा तीच मते लांडेंपासून दूर जाण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीला आघाडीधर्म पाळण्याचा सल्ला –
शहर कॉंग्रेसने पुरस्कृत उमेदवारांना केवळ विरोधच केला नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही कान टोचले आहेत. पत्रकात म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्षाची भूमिका नेहमी जातीयवादी पक्षांविरूद्ध लढण्याची आहे. चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसला मानणारा बहुसंख्य मतदार आहे. शहर पदाधिकाऱ्यांनी आघाडीचा धर्म पाळावा असा कॉंग्रेसच्या वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे. परंतु, “पुरस्कृत’ उमेदवाराला मदत करणे शहर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मान्य नाही.

शहरात कोणताही उमेदवार पुरस्कृत करण्याअगोदर राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी संवाद साधायला हवा. स्थानिक पातळीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी व वरिष्ठ पातळीवर वरिष्ठांशी चर्चा न करता राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार पुरस्कृत केल्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते चिंचवड व भोसरीमध्ये पुरस्कृत उमेदवाराचे काम करणार नाहीत, असेही सचिन साठे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)