#CWC19 : मँचेस्टरचं ग्राउंड ‘विराट’साठी लकी! स्पर्धेत आतापर्यंत याच ग्राउंडवर मोडले दोन विक्रम

मँचेस्टर – आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येकच सामन्यामध्ये ‘विराट’ खेळी करणारा भारताचा धडाकेबाज फलंदाज तथा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आज क्रिकेटजगतातील आणखी एक विक्रम पादाक्रांत केला आहे. विराटने आज विश्वचषक स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या साखळी सामन्यामध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये २०हजार धावा पूर्ण करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महान फलंदाज ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये २०हजार धावांचा पल्ला गाठण्याचा मान यापूर्वी ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे होता. या दोन्ही महान फलंदाजांनी ४५३ सामन्यांमध्ये २०हजार धावा पूर्ण करत आपल्या नावे हा विश्वविक्रम नोंदविला होता. मात्र आज टीम इंडियाची ‘रन-मशीन’ म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने केवळ ४१६ सामन्यांमध्ये २०हजार धावांचा पल्ला ओलांडत सर्वाधिक जलद गतीने २०हजार धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

कोहलीने क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या एकूण ४१६ सामन्यांमध्ये २०हजार धावांचा पल्ला पार करत हा विक्रम आपल्या नावावर केला असून हा पल्ला गाठणारा तो जगातील बारावा तर भारतातील तिसरा फलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे मँचेस्टर येथील याच ओल्ड ट्रेफोर्ड मैदानावर कोहली पाकिस्तान विरुद्धच्या १६ जूनच्या सामन्यामध्ये सर्वाधिक जलद गतीने एकदिवसीय सामन्यामध्ये ११ हजार धावांचा टप्पा गाठणार फलंदाज ठरला होता. आता कोहलीने दुसरा विश्वविक्रमही याच मैदानावर मोडल्याने त्याच्यासाठी हे ग्राउंड लकी ठरताना दिसतंय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here