विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मेळावा; तैलचित्राचे अनावरण
पाटण (प्रतिनिधी) – विक्रमसिंह पाटणकर यांनी 1983 सालापासून पाटण तालुक्याचा सर्वांगीण विकास केला, हे वेगळे सांगायची गरज नाही. शरद पवार यांच्या कर्तृत्वातून दादांनी तालुक्यातील पठारावर पवनऊर्जा प्रकल्पांचे स्वप्न पूर्ण केले. दादांच्या मागे उभे राहिल्यास तालुक्याचे कल्याण होईल. माझा माणूस माझ्या बरोबर द्या, मग बघा काय करतो ते. शिक्षणाने स्मरणात भर पडते. युवकांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर जावे. शेतकऱ्यांनी शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सेंद्रिय शेती करावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद व पाटण पंचायत समितीचा कृषी विभागाच्यावतीने रविवारी झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त खा. पाटील यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, युवा नेते सारंग पाटील, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगौड, जिल्हा परिषद सदस्या संगीता खबाले-पाटील, बापूराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, आपला भाग डोंगराळ आहे. येथे सुगंधी, औषधी वनस्पती व सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. मुलांना उच्च शिक्षण देऊन ती उच्च पदावर गेली पाहिजेत. त्यांच्या ज्ञानाचा शेतीत वापर झाला पाहिजे. सत्यजित व सारंगबाबा यांनी शेती आणि शिक्षण या बाजू लावून धरल्यास तालुक्याला फायदा होईल. सेंद्रिय शेती केली तर चांगला दर मिळेल. त्यासाठी शिबिरे घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या तरच त्यांची प्रगती होईल. शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून चौदा गावे वगळण्यासाठी आम्ही आंदोलने केल्याने शासननिर्णय निघाला. मात्र, सात महिने झाले तरी अंमलबजावणी नाही.
आता आपले सरकार असून खासदारांच्या माध्यमातून हा प्रश्न नक्की सुटेल. सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील यांची भाषणे झाली. उपसभापती राजभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक केले. सभापती उज्ज्वला जाधव यांनी स्वागत केले. मेळाव्यास कोयना कृषकचे अध्यक्ष बाबुराव सुतार, दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव जाधव, पाटण अर्बन बॅंकेचे चेअरमन दिनकर घाडगे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते, बाजार समितीच्या सभापती रेखा पाटील, पंचायत समिती सदस्य विलासराव देशमुख, बबनराव कांबळे, उज्ज्वला लोहार, दीपाली पाटील, वंदना सावंत, अशोक देसाई, गुरूदेव शेडगे, सदाभाऊ जाधव, रघुनाथ जाधव, शिवाजीराव पाटील, सचिन जाधव उपस्थित होते.