पुणे – खोटे अमिष दाखवून फ्लॉट धारकाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी फेटाळला. या प्रकरणात गोखले यांना न्यायालयाने यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, गोखले हे संबंधित कंपनीचे अध्यक्ष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम मोठी आहे. गोखले यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ऍड. पुष्कर सप्रे यांनी केला. त्यानंतर याबाबत अंतिम निकाल देताना न्यायालयाने अर्ज नामंजूर केला आहे.
मुळशी तालुक्यातील डोंगरगाव आणि होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी या तिघांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात 14 गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिला होता. आरोपींनी मुळशीतील “गिरीवन’ नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे, असे भासवले. त्या आधारे ग्राहकांना आकर्षित केले व तक्रारदार यांच्यासह 14 जणांची एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमुद आहे.