मुंबई, दि. 6- मुंबई उच्च न्यायालयाने अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला आज सशर्त जामीन मंजूर केला. सीबीआयचा याप्रकरणी तपास अद्याप सुरू आहे. आरोपीविरोधात आरोप निश्चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्य नाहीत आणि आरोपीविरोधात नव्याने साक्षीपुरावे सापडणे आणि नवे आरोप लागणेही शक्य नसल्याचा युक्तिवाद बचावपक्षाने उच्च न्यायालयात केला होता, जो ग्राह्य धरला गेला.
विक्रम भावे मागील दोन वर्षापासून सीबीआयच्या केसमध्ये अटकेत होता. पुण्यात साल 2013 साली डॉ. दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सीबीआयने या प्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांना घटनास्थळाची रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी विक्रम भावेनेच मदत केल्याचा आरोप तपासयंत्रणेने केला आहे.