विखे लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ- अब्दुल सत्तार

संगमनेर: माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत जाण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एक विचाराने लोणी येथील बैठकीत घेतला आहे. विखेंना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असून, त्यांना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी विखेंचा निर्णय अंतिम असून, येत्या 1 तारखेला विखे शपथविधी घेणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरात एका खासगी कार्यक्रमासाठी शनिवारी (दि. 25) संध्याकाळी सत्तार आले होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते. थोरातांच्या तालुक्‍यात हे व्यक्तव्य केल्याने आता सगळ्यांचे डोळे विस्फारले आहेत. विखे पाटील यांनी विरोधी पक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांचे लक्ष ते काय निर्णय घेतात, याकडे लागले आहे. विखे पाटील भाजपात प्रवेश करणार, हे आता नक्की झाले आहे. त्यातच शनिवारी लोणी येथे विखे समर्थक तेरा आमदारांची गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्यासह आ. सत्तार यांच्यासह आणखी किती आमदार भाजपात जाणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.