विखे असे वागतील, मला वाटत नाही – बाळासाहेब थोरात

संगमनेर: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला आहे. नगरमधील सभेत 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ना. विखे पाटील भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यावर विखे यांचे विरोधक मानले जाणारे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील पक्षाचे प्रमुख नेते असून, ते वेगळं वागतील, असं मला वाटतं नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आ. थोरात संगमनेरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ना. विखे पाटील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे प्रमुख नेते आहेत. विखे पाटील नगर आणि शिर्डीत आघाडीसाठी काम करतील, अशी अपेक्षा आहे. प्रसारमाध्यमांतून विखे पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू असून, यावर प्रतिक्रिया देताना आ. थोरात यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या, तरी राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळं वागतील, असं मला वाटत नाही, अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले.

सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मत-मतांतरे असतात. मात्र यावेळची निवडणूक विचारधारेची असून, आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि भाजप सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे, अशी विनंती देखील त्यांनी केली.

विखे पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला आहे. नगरमधील सभेत 12 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलाच्या प्रवेशानंतर आता पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपच्या गोटात सामील होण्याबाबत चर्चा होत्या. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेण्याचं सूतोवाच करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. डॉ. सुजयच्या तिकिटावरुन निर्माण झालेला गोंधळ थांबवण्याचा मी प्रयत्न केला. मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही, असे विखे म्हणाले होते. तसेच डॉ. सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता. त्याला भाजपने सन्मानाने बोलावलं. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, अशा भावनाही विखे पाटलांनी व्यक्त केल्या होत्या. त्यांनी डॉ. सुजय विखे यांचा प्रचार देखील सुरु केला होता. आता ते स्वत: भाजप प्रवेश करणार असल्याने भाजपची ताकत आणखी वाढणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.