बाळासाहेब सोनवणे
राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कोण रिंगणात उभे राहणार, याची चर्चा मतदार संघामध्ये आहे. कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे, मेहुणे अरुण कडू, कन्या शरयू देशमुख, डॉ. एकनाथ गोंदकर की राहता नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाचे प्रमुख डॉ. राजेंद्र पिपाडा, अशी चर्चा सुरू आहे. परंतु ना. विखे पाटील यांच्या विरोधात आ. बाळासाहेब थोरात हे कोणता उमेदवार देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिर्डी मतदारसंघात 1980 पासून विखे कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या गणेश, प्रवरा, संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसर असा तयार झाला आहे. संगमनेर तालुक्यातील 26 गावे या मतदार संघात जोडली गेल्याने प्रामुख्याने बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यातील हे 26 गावे आहेत.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गावांवर आपली पकड मजबुत केली आहे. गणेश परिसरात निळवंडेच्या कालव्यांना गती देऊन, तसेच बंद पडलेला गणेश सहकारी साखर काखाना सुरु करुन येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून परिसरात विकासाची गंगा सुरु ठेवली. त्यामुळे गणेश परिसरावरही विखे यांनी आपली पकड मजबुत केली आहे.
आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये विखे पाटील व आ. बाळासाहेब थोरात यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. निवडणुकीमध्ये राजकीय कुरघोडी दोघांनी एकमेकांवर सुरुच ठेवल्या आहेत. शिर्डी मतदारसंघात विखे यांचे मतदान कमी कसे होईल व संगमनेर मतदारसंघात आ. थोरात यांचे मताधिक्य कमी कसे राहील, यासाठी दोन्ही नेते सातत्याने प्रयत्नात राहत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला या दोन्ही नेत्यांची राजकीय वैर माहीत आहे. ना. विखे पाटील यांच्या विरोधात कोण उभे राहील, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी आ. थोरात हे देतील तोच उमेदवार त्यांच्या विरोधात असेल.
मागील 2014 च्या निवडणुकीत विखेंच्या विरोधात शिवसेनेचे अभय शेळके, भाजपचे राजेंद्र गोंदकर यांनी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र ना. विखे यांनी राज्यात सर्वाधिक 75 हजारांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. कॉंग्रेसचा त्याग करुन आता विखे भाजपवासी झाले आहेत. या मतदार संघात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नामशेष झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खा. डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे ना. विखेंच्या विरोधात कोणता उमेदवार उभा करण्यात येतो, याकडे लक्ष लागले आहे.