ठाणे – गॅंगस्टर विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा गुंड अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा साथीदार सोनू तिवारी यांना शनिवारी मुंबई एटीएसमधील दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून अटक केली. या दोघांना ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
सुनवणीवेळी त्रिवेदीचे वकिल म्हणाले, या दोघांवरील गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये नोंद असल्याने महाराष्ट्रात त्यांची चौकशी करण्याची गरज नाही. म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तीवाद केला. तर आम्हाला रस्ते मार्गाने न नेता, हवाई मार्गाने घेऊन जावे, अशी मागणी गुड्डन त्रिवेदी याने आज ठाणे न्यायालयात केली. विकास दुबेला ज्याप्रकारे मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशला घेऊन जाताना रस्त्यात चकमकीत ठार मारण्यात आले, त्या प्रकारे मला देखील मारतील, अशी भीती त्रिवेदी याने वकिलांमार्फत कोर्टात सांगितली.
उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक या दोघांना घेण्यासाठी रवाना झालेली असल्याने, जोपर्यंत हे पथक येत नाही तोपर्यंत या दोघांना तळोजा कारागृहात ठेवले जाईल. कारागृहात नेण्याच्या आधी त्यांची कोविड-19 ची चाचणी देखील करण्यात येईल. दरम्यान विमानाने प्रवासाबाबतची मागणी न्यायालयाने ऐकून घेतली असली तरी त्यावर निर्णय दिलेला नाही.