विज्ञानविश्व : गाड्यांचं तापमान सांभाळताना

उन्हाळ्यात उष्णतेचा तडाखा आणि हिवाळ्यात जीवघेणी थंडी गेली, काही वर्षे जगात अशी स्थिती पाहायला मिळते आहे. उष्णतेच्या लाटांमध्ये गरज नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना मिळत आहेत आणि कडाक्याच्या बर्फवृष्टीत घराबाहेर पडणं अशक्यच होत आहे.
या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जगातल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. ग्लोबल वॉर्मिंग सोबत यावर्षी एल निनोचा ताप आपण सोसतो आहोत. या तापमानाचा फटका वाहनांनाही बसतो. प्रचंड उन्हात वाहनांचे रंग आणि त्यांचे प्लॅस्टिक भाग वितळणे, त्यांना आग लागणे अशा दुर्घटना वाढत चालल्या आहेत. दुसरीकडे तापलेल्या किंवा गारठलेल्या गाड्या सुरू केल्यावर भरपूर ऊर्जा खर्च करून त्यांचं तापमान सुसह्य करावं लागतं.
मात्र आता त्यासाठी तंत्रज्ञानाने एक चांगला उपाय आणला आहे- थर्मल क्लोथ, म्हणजे उष्णतेला रोखणाऱ्या कापडाचं कव्हर. “डिव्हाइस’ या जर्नलच्या जुलै अंकात या कापडविषयी शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
शांघाय जिओ टोंग विद्यापीठातील संशोधकांनी या कव्हरसाठी दोन थरांचं कापड वापरलं. त्याचा बाहेरील थर सिलिका तंतूंनी बनवलेला आहे. तो दृश्य प्रकाश परावर्तित करतो. त्यावर बोरॉन नायट्राइडचा लेप आहे. तो अल्ट्राव्हायोलेट किरणांचं परावर्तन करतो. दोन्ही मिळून सुमारे 96 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित होतो. त्याच वेळी हा थर आसपासच्या भागातून उष्णता शोषून घेऊन ती इन्फ्रारेड किरणांच्या स्वरूपात बाहेर टाकतो. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून कव्हरच्या आतलं तापमान कमी होतं.
या कव्हरचा आतला भाग ऍल्युमिनियम फॉइलने बनवलेला असल्याने तो आतील गाडीला बाहेरील उष्णतेच्या संपर्कात येऊ देत नाही. उन्हाळ्यात गाड्या पार्क करून ठेवताना हे कव्हर लावलं तर आतील तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा आठ अंश सेल्शियसनी कमी राहिलेलं प्रयोगात आढळून आलं आहे. याचा फायदा हिवाळ्यातही दिसून येतो. आत पुरेशी ऊब राहते आणि बाहेरच्या तुलनेत पाच अंश सेल्शियसनी जास्त तापमान राखलं जातं.
जागतिक पातळीवर एकूण ऊर्जा वापराच्या 20 टक्के वापर घरं, इमारती आणि वाहनांमध्ये सुसह्य तापमान राखण्यात होतो. त्यात बाहेर उच्च तापमान असताना कूलिंग आणि बाहेर अति थंड असताना हीटिंग, दोन्हींचा समावेश आहे. या कापडाच्या सहाय्याने वाहनांसाठीचा ऊर्जा वापर बराच खाली आणता येईल. ऊर्जेची गरज घटली की पर्यायाने प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगदेखील थोड्या प्रमाणात घटू शकतं. तापमान नियंत्रित राहिलं की वाहनं बिघडत नाहीत. त्यांचं आयुष्य वाढतं. या दृष्टीनेही हे कापड उपयुक्त होईल.
हीच कल्पना पुढे नेऊन घरांच्या छतावर असा दुहेरी थर देता येईल का? 98 ते 99 टक्के उष्णता परावर्तित करणारे रंग हळूहळू बाजारात येत आहेत. त्यात असे प्रयोग करायला संधी आहे.
डॉ. मेघश्री दळवी





