नागपूर – ओबीसी आरक्षण संदर्भातली एक उपसमिती हरवलीय. ती समिती काही काम करत नाही, अशा आशयाचे पत्र भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिले होते. त्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्यावर खरमरीत टीका केलीय.
‘गोपीचंद पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो नुकतंच उगवलेलं गवत आहे. तो सध्या आपल मुळ शोधत आहे. त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. तो ज्या जिल्ह्यातून येतो तिथे ओबीसी आरक्षण कमी झालेला नाही. झळ आमच्या जिल्ह्यांमधील ओबीसींना बसली आहे, असे एकेरी भाषेतही विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांवर निशाणा साधला.
शाळा सुरु करण्याच्या मुद्यावर वडेट्टीवार म्हणाले की, करोनाची तिसरी लाट येईल याबद्दल मुख्यमंत्री वारंवार सावध करत आहेत. मात्र, तरीही काही लोक मंदिर उघडण्याची मागणी करत आहे. मागणी करायची आहे तर शाळा उघडण्याची करा. तिसरी लाट येईल की नाही हे कुणालाच माहित नाही मात्र गर्दी टाळणे हे गरजेचे आहे. तिसरी लाट आली तर शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी पुढे ढकलावा लागेल, असंही ते म्हणाले.