नवी दिल्ली – वर्षभर सोशल मिडिया चित्रपट सृष्टीतील कलाकरांनी व्यापला असला तरी त्यात बाजी मारली ती तमीळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपतीने. त्याने चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात ट्विटरवर शेअर केलेल्या एका सेल्फीने विक्रम केलेला आहे. विजयने नेवेली गावात गेल्यावर तेथील जनसमुदायासमवेत काढलेली सेल्फी ट्विटरवर सगळ्यात जास्त वेळा रिट्विट करण्यात आलेली आहे.
त्रासदायक गोष्ट म्हणजे अभिनेता विजयवर यावर्षी प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांची चर्चा होऊनही त्याच्या लोकप्रियतेत फार पडलेला नाही. नेवेली गावातील जनसमुदायाबरोबर त्याने काढलेली सेल्फी 1,77,000 लोकांनी रिट्विट केली आहे आणि 3,77,000 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केली आहे. अर्थात लाईकच्या शर्यतीत विजयला मागे टाकले ते म्हणजे, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या छायाचित्राने.
अनुष्काने गर्भवती असल्याचे जाहीर करून विराटसोबतचे जे छायाचित्र शेअर केले होते त्याला ट्विटरवर सर्वाधिक लाईक मिळाले आहेत. विजयची लोकप्रियता तमिळनाडूमध्ये खूप जास्त आहे. मात्र, जेव्हा त्याच्या निवासस्थांनी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले तेव्हा त्याला तडा गेला. मागील वर्षी त्याचा बिजिल हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जी कमाई केली त्यामध्ये विजयने काहीतरी गोलमाल केला असल्याचे सांगण्यात येते.
प्राप्तीकर विभागाने चेन्नईत त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो नेवेली गावात त्याच्या पुढच्या मास्टर नावाच्या चित्रपटाचे शूटींग करण्यात व्यस्त होता. त्यावेळी प्राप्तीकर विभागाने त्याला शूटींग थांबवून चेन्नईला बोलवून घेतले आणि त्याची चौकशी केली होती. मात्र या घटनेचा त्याच्या लोकप्रियतेवर फारसा फरक पडला नाही. सध्या तो मास्टर हा चित्रपट प्रदर्शित होणयाची वाट पाहतो आहे.
नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यू-ट्यूबवर तो प्रदर्शित होताच सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर म्हणून ओळखला जाऊ लागला. लोकेश कनागराज यांच्या या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. जानेवारी महिन्यात संक्रात/पोंगलच्या आसपास हा चित्रपट प्रदर्शित होण्याची चिन्हे आहेत. ट्विटरने त्यांच्याकडील वर्षभराची आकडेवारी जाहीर केली आहे.
राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचे छायाचित्र सर्वाधिक रिट्विट करण्यात आले. त्यामध्ये ते घरात दिवा लावत असल्याचे दिसते. क्रीडा क्षेत्राचा विचार केला तर महेंद्रसिंह धोनीने पंतप्रधानांकडून जेव्हा कौतुकचे पत्र स्वीकारले आणि त्यांचे आभार मानले ते ट्विट केले त्याचे ते ट्विट सर्वाधिक रिट्विट करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रात यंदाच्या आयपीलचे सर्वाधिक हॅशटॅग वापरले गेले तर चित्रपटाचा विचार केला तर सुशांतसिंह राजपूतच्या दिल बेचारा या शेवटच्या चित्रपटाविषयी सर्वाधिक हॅशटॅग वापरले गेले.