विजय पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार जाहीर

कोल्हापूर  : खाशाबा जाधव जयंतीनिमित्त 15 जानेवारीला महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा होत असून पुणे, नाशिक आणि कराड येथे विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात धु्रवतारा फाऊंडेशनच्या वतीने खाशाबा जाधव पुरस्कार त्यांच्या ऑलिम्पिक पदकाचे पूजन आणि ऑलिम्पिकमध्ये भारत या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कोल्हापूरचा राष्ट्रीय पदक विजेता कुस्तीगीर विजय बाजीराव पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या 95 वी जयंतीनिमित्त पहिला ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्कार ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांनाही  देण्यात येणार आहे.
1988 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व मनोज पिंगळे यांनी केले होते. आता प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. मानचिन्ह, रोख अडीच हजार, पुस्तके, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी देशाचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधव यांनी 1952 हेलसिंकी स्पर्धेत जिंकलेल्या पदकाचे पूजन करण्यात येणार आहे. अशी माहिती धु्रवतारा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गणेश भरेकर यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून 15 जानेवारी खाशाबा जाधव जयंती ही महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी होत आहे. कराडमध्ये गोळेश्वर येथील ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृती स्तंभला बुधवारी अभिवादन करण्यात येणार आहे. नाशिकमध्येही सलग दुसर्‍या वर्षी खाशाबा जाधव पुरस्कार गुणवंत खेळाडूंना देण्यात येणार आहे.
याप्रसंगी स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव, श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष विजय बराटे, हिंदकेसरी अमोल बराटे , धु्रवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.