Vijay Kadam Passed Away । मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीत चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे मुंबईत निधन झालं.
हरहुन्नरी कलाकार गमावला Vijay Kadam Passed Away ।
विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिग्गज अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी रंगभूमी , चित्रपट अन् हिंदीतही केले काम Vijay Kadam Passed Away ।
विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. मराठी सिनेमेच नाही विजय कदम यांनी मराठी रंगभूमी देखील गाजवली. विजय कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे त्यांचं लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1980च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.
त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक हिट मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटकं आहेत. ती परत आलीये ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बाबुराव तांडेल ही भुमिका साकारली होती. या मालिकेत अनेक वर्षांनी विजय कदम प्रेक्षकांसमोर आले होते.