नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या देशांतर्गत एकदिवसीय विजय हजारे या स्पर्धेत सोमवारी केरळ आणि कर्नाटक यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटक संघाचा सलामी फलंदाज देवदत्त पडिकल यांनी एका खास विक्रमाची नोंद केली.
केरळ विरुद्ध खेळताना देवदत्त पडिकलने 101 धावांची शतकी खेळी करताना शतकांच्या विक्रमाचा इतिहासच बदलून टाकला. या स्पर्धेत देवदत्त पडिकलचे हे सलग चौथे शतक आहे. त्याचबरोबर त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. देवदत्त पडिकल हा आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करतो.
सोमवारी केरळ आणि कर्नाटक या संघात विजय हजारे ट्रॉफीमधील एक सामना खेळला गेला. या सामन्यात कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 3 बाद 338 धावा केल्या. यामध्ये कर्णधार रविकुमार समर्थने 192 धावांची आणि देवदत्त पडिकलने 101 धावांची दमदार खेळी केली.
या स्पर्धेत कर्नाटक संघाच्या सलामी फलंदाजांकडून ठोकण्यात आलेले सलग चौथे शतक आहे. या शतकाच्या जोरावर देवदत्त पडिकलने विराट कोहलीशी बरोबरी केली.
देवदत्त पडिकलने केला शतकांचा विक्रम
अर्धशतक ठोकत या स्पर्धेची सुरुवात करणार्या देवदत्त पडिकलने मागील चार सामन्यात सलग चार शतके ठोकली आहेत. दुसर्या सामन्यात त्याने बिहार विरुद्ध 97 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर ओडीसा विरुद्ध 152 आणि केरळ विरुद्ध नाबाद 126, तसेच रेल्वे विरुद्ध नाबाद 145 धावांची खेळी करताना शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. आता क्वार्टर फाइनल मध्ये केरळ विरुद्ध 101 धावांची खेळी साकारून शतकांचा विक्रम केला आहे.
विराट कोहली च्या विक्रमाशी केली बरोबरी
एका हंगामात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग चार शतकी ठोकत देवदत्त पडिकलने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यापूर्वी विराट कोहलीने दिल्ली संघाकडून खेळताना 2008-09 च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या एका हंगामात सलग चार शतके ठोकली होती. त्यामुळे देवदत्त पडिकलने एका हंगामात सलग चार शतके ठोकत त्या विक्रमाशी बरोबरी केली.