जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार

पारनेर  – राज्य आणि राष्ट्राच्या विकासाची चावी निवडणुकीच्या रिंगणता असलेल्या उमेदवारांच्या हातात नाही. ती चावी मतदारांच्या हातात आहे. उमेदवारांच्या हातात देशाच्या विकासाची चावी आहे, असे लोकांना वाटत असेल, तर स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही देशाची ही अवस्था होण्याचे कारण काय, अशी खंत प्रसिद्धी पत्रकाद्वारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

जागृत मतदार सदृढ व निकोष लोकशाहीचा आधार आहे. राज्य आणि राष्ट्राला बदलण्याची चावी मतदारांच्या हातामध्ये असूनही मतदार चावी लावण्यास विसरले आहेत. एक नोट मिळाली की मतदार भ्रष्टाचारी, गुंड, सरकारी तिजोरीची लूट करणारा, व्यभिचारी उमेदवाराला आपले मत देतो. त्यामुळे विधानसभा व लोकसभे सारख्या पवित्र मंदिरांमध्ये कलंकीत व भ्रष्टाचारी उमेदवार निवडून जातात. हे लोक राज्य आणि देशाचे भविष्य कसे घडविणार? त्यामुळे मतदारांनी विचार करण्याची गरज आहे.

भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला हवी की मी निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारी, गुंड, लुटारू, व्यभिचारी उमेदवाराला माझे अमूल्य मत देणार नाही. जो उमेदवार चारित्र्यशिल आहे, समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी दिव्यासारखा रात्रंदिवस जळत आहे, त्याच उमेदवारालाच माझे मत देईल. ही चावी मतदारांनी लावली, तर राज्य आणि देश बदलेल. आज राजकारणातील अनेक उमेदवार भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेलेले आहेत. जर मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता राज्य, राष्ट्र आणि समाजाच्या भल्यासाठी सेवाभावाने काम करणाऱ्या उमेदवाराला आपले मत दिले असते, तर बदल घडला असता. असे उमेदवार तुरुंगात गेले नसते.

अनेक मतदार चारित्र्यशिल उमेदवार मिळणे कठीण आहे. त्यामुळे मत द्यायचे कुणाला? अशी विचारणा करतात. अशा वेळी नोटाच्या चिन्हावर मोहर लावावी. फक्‍ट नोटावर मोहर लावून बदल घडणार नाही, हे आपणाला माहीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आमची मागणी होती की ज्या निवडणूक क्षेत्रामध्ये उमेदवाराला जेवढे मत मिळाले आहेत, त्यापेक्षा जास्त मत नोटाला मिळाले, तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घ्यावी आणि मतदारांनी नाकारलेल्या उमेदवारांना परत निवडणुकीसाठी उभे राहण्यास परवानगी नसावी. त्यामुळे पक्ष-पार्ट्या गुंड, भ्रष्टाचारी, लुटारू, व्याभिचारी उमेदवाराला तिकीट देणार नाहीत. ज्यामुळे लोकसभा व विधानसभेसारख्या पवित्र मंदिरांमध्ये चारित्र्यशिल उमेदवार निवडून जातील, असेही हजारे म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.