पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर पदवी संस्थेत (वायसीएम) संशयित करोना रूग्णांसाठी तातडीने अतिदक्षता कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू करण्यात आला आहे. संबंधित कक्षामध्ये 15 खाटांची व्यवस्था केली असल्याची माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
वायसीएम रुग्णालयात संबंधित कक्षातील रुग्णांसाठी गरजेनुसार मॉनिटर, व्हेंटीलेटर आदींची सुविधा दिली जाणार आहे. शहरात स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेच्या वतीने अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आला होता. त्याच धर्तीवर करोना रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष सुरू करावा, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार तातडीने त्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
डॉ. वाबळे म्हणाले, करोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांना राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील उपचारांसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय (मुंबई) आणि डॉ. नायडू रुग्णालय (पुणे) येथे हलविणे आवश्यक आहे. शहरात अद्याप करोना संशयित रुग्ण आढळलेला नाही. तथापि, असे रुग्ण आढळल्यास त्यांना एखाद्या दिवसासाठी आपण संबंधित वॉर्डमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर त्यांना शासनाने केलेल्या सूचनेनुसार पुण्यातील नायडू रूग्णालयात हलविण्यात येईल. तथापि, आवश्यक पूर्वतयारी आणि पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्या आहेत.