श्रीनगर – पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’कडून काश्मीर खोऱ्यात ताबा रेषेजवळ ड्रोनचा वापर केला गेल्याचे उघड झाल्यामुळे अशा ड्रोनबाबत सुरक्षा दलांकडून आता विशेष सतर्कता बाळगली जाऊ लागली आहे. दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकत असल्यामुळे ही सतर्कता बाळगली जाऊ लागत आहे.
जम्मू विभागातील पीर पंजाल येथील लष्कराच्या हद्दीमध्ये असे ड्रोन पाडले गेले होते. त्यामध्ये रायफल बसवण्यात आली होती. तेंव्हापासून अशाप्रकारे ‘एलओसी’जवळ ड्रोन उडत असेल, तर त्यावर लक्ष ठेवले जात आहे, असे काश्मीरमधील एक्सव्ही कोर्प्सचे जनरल-ऑफिसर-इन-कमांड लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यात जमा झालेल्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि दारूगोळाची तीव्र कमतरता भासत आहे. त्याकरिता ते सीमेपलीकडून मदतीची अपेक्षा करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जून महिन्यात बीएसएफने कथुआ जिल्ह्यात आंतरराष्टीय सीमेजवळ एक पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. त्यामध्ये एक अत्याधुनिक रायफल आणि 7 ग्रेनेड बसवलेले होते. या चिनी बनावटीच्या ड्रोनचे वजन 17.5 किलो होते आणि अमेरिकन बनावटीच्या सेमी ऍटोमॅटिक एम 4 कार्बाईन आणि चिनी गेनेडसह 5.5 किलोचे वजन त्यात लादलेले होते.