विधानसभा : भाजप, सेना, कॉंग्रेस, अपक्षांचा समावेश
वडगाव मावळ – मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 27) 11 नामनिर्देशन अर्जांची आणि सोमवारी (दि. 30) सहा नामनिर्देशन अर्जांची अशी एकूण 17 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली. मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष बागडे यांनी दिली.
शुक्रवारपासून (दि. 27) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मावळ तहसीलदार कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळचे तहसीदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. या वेळी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, आर. एल. कांबळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.27) मोरेश्वर गंगाधर बवरे, अभिजित अनिल आपटे, बाळासाहेब नेवाळे, खंडू बाळू तिकोणे, नामदेव सावळेराम दाभाडे, शांताराम नरवडे, रवींद्र आप्पा भेगडे, मंदाकिनी शशिकांत भोसले, सागरा निर्गुण बोडके, राजेश शशिकांत खांडभोर यांचे दोन एकूण 11 नामनिर्देशन पत्र यांनी घेतले. व सोमवारी (दि. 30) सुधाकर शंकरराव शेळके, चंद्रकांत आप्पासाहेब सातकर, संभाजी शिवराम वाघमारे, महेंद्र कचरू ओव्हाळ, रवी रामभाऊ पंडागळे, गोपाळ यशवंतराव तंतरपाळे एकूण 6 नामनिर्देशन अर्ज घेतले. एकूण 17 नामनिर्देशन अर्जाची विक्री झाली. एकूण 4 दिवस राहिले असून, अद्यापही एकही नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.
मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. 27) ते शुक्रवार (दि. 4) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मावळ तहसीलदार कार्यालयात दाखल करण्याचा कालावधी आहे. शनिवारी (दि. 5) सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. सोमवारी (दि. 7) दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे कालावधी आहेत. सोमवार (दि. 21) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल. गुरुवारी (दि. 24) सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग आणि रिसर्चच्या प्रांगणात मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी रविवारपर्यंत (दि. 27) आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्या प्रशिक्षण –
बुधवारी (दि. 2) तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग आणि रिसर्चमध्ये 2400 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन सत्रांत सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजता असे एका वेळी 1200 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण घेणार असल्याची माहिती दिली. शुक्रवारपर्यंत (दि. 4) नवीन मतदान नोंदणी होणार असल्याने आणखी दोन हजार मतदान वाढणार आहे. 31 ऑगस्टपर्यत तीन लाख 45 हजार चारशे मतदार आहेत.