प्रचाराचा सुपरसंडे

उमेदवारांची धावपळ, सुट्टीच्या दिवशी मतदारांच्या गाटीभेटी घेण्यावर भर

पिंपरी – विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. त्यात आता उमेदवाराला अधिकृत प्रचारासाठी आज सुट्टीचा एकच दिवस मिळणार असल्याने शहरातील तीनही मतदारसंघात आज दि. 13 ऑक्‍टोबर हा दिवस प्रचाराचा सुपरसंडे ठरल्याचे दिसून आले. शहरातील विविध भागात आज प्रचाराच्या रिक्षा, रॅली, पदयात्रा, घोषणाबाजी दिसून आली.

रविवार हा प्रचाराचा सहावा दिवस होता. पुढच्या शनिवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे सोने करण्यासाठी उमेदवारांनी दिवसभर प्रचारावर भर दिला. कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात असणाऱ्या तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी आजचा रविवार प्रचारासाठी महत्वपूर्ण होता. शहरातील रहिवाशी हे बहुतांश नोकरवर्ग असल्याने या मतदारांपर्यत सुट्टीच्या दिवशी पोहचण्यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

आज दिवसभर शहरात घरोघरी जाऊन मतदारांना भेटणारे उमेदवार, जागोजागी त्यांना होणारे औक्षण आणि त्याच वेळी पक्षाच्या आणि काही ठिकाणी उमेदवाराच्या नावाने होणारा जयघोष असेच चित्र विविध भागात पहायला मिळाले. सध्या, प्रचाराचा दुसरा टप्पा सुरु असून आता प्रचारासाठी सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे, रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला.

शहरात उन्हाचा चटका वाढल्याने या पदयात्रांनी दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र टेम्पो, रिक्षांमधून होणारा प्रचाराचा जोर कायम होता. रिक्षांवर लावलेल्या भोंग्यांमधून पक्षाची व उमेदवारांची उडत्या चालीची गाणी मतदारांच्या कानावर धडकत होती. दुपारनंतर उन्हाची तीव्रता कमी होऊन शहरावर पावसाचे सावट दिसत होते. पावसाचे चित्र असतानाही पदयात्रांना गती आली होती. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी पदयात्रांबरोबरच घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.