सोशल मीडियाच्या प्रचारातून रंगले ‘पाऊसबीज’

शेवटच्या दिवशी भरपावसात उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दमछाक : प्रचारतोफा विसावल्या

भवानीनगर – इंदापूर तालुक्‍यातील विधानसभा निवडणुकीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रचाराची राळ उडाली. त्यात शुक्रवारपासून वादळी पावसाने तापलेल्या प्रचारावर शिडकावा मारल्याचे चित्र दिसत होते. सातारा येथील शरद पवार यांची भरपावसातील सभा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा खुबीने वापर करण्यात कार्यकर्ते मश्‍गूल झाले आहेत. हा पाऊसबीज प्रचाराच्या केंद्रबिंदू राहिला होता. त्यातच प्रचाराची सांगता झाली.

इंदापूर तालुक्‍यातील गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीची हवा चांगलीच गरम झाली आहे. यात भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन दिग्गज उमेदवारांची राजकीय कसोटी पणाला लागली आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून इंदापूरचे मैदान दुमदुमून सोडले आहे. शुक्रवारी सातारा येथील शरद पवार यांच्या सभेतील पावसाचा शिडकावा इंदापूर तालुक्‍यातील गावांगावांत पोहोचला. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची पाठ सोडली नाही. त्यामुळे शनिवारी दिवसभर भरपावसात शरद पवार यांच्याप्रमाणे भिजतच प्रचाराची धुरा सांभाळली.

उमेदवारांचे कार्यकर्ते, त्यांच्या परिवारातील सदस्य प्रचारात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत होते. उमेदवार सहकुटुंब प्रचारात उतरल्यामुळे कुटुंब रंगले प्रचारात याची प्रचिती सर्वसामान्यांना आली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हा प्रचाराचा धडाका विसावला. त्यामुळे आता उमेदवारांना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना थोडीशी क्षणभर विश्रांती मिळाली. गेल्या महिन्याभरापूर्वी उमेदवारी कोणाला मिळणार, याची चर्चा सुरू होती. त्यावेळी उमेदवारीवरून इंदापूरचे मैदान चांगलेच तापले होते. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीतील बिनीचे शिलेदार कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपच्या छावणीत दाखल झाले. त्यानंतर निवडणुकीत रंगत आली. इंदापूरच्या मैदानावर भाजपचे दिल्लीतील नेत्यांनी हजेरी लावली. सोशल मीडियातून मतदारांशी संपर्क, युवा कार्यकर्त्यांचे नेटवर्क या यंदाच्या निवडणुकीतील जमेच्या बाजू ठरल्या आहेत.

पडद्याआड प्रचाराच्या हालचाली गतिमान – 
इंदापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार समाप्त झाल्यानंतर आता पडद्याआड प्रचाराच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्या महिन्यापासून राजकीय मशागत, उमेदवारीवरून चाललेला घोळ, सोशल मीडियाचा पुरेपूर वापर, याचा खुबीने प्रचार केला. त्यानंतर भरपावसात आता पाच वर्षांचा लेखाजोखा शेवटच्या दिवशी मांडल्यानंतर पडद्याआड प्रचाराच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. रात्र वैऱ्याची याप्रमाणे उमेदवार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी मतदानांच्या शेवटच्या क्षणापर्यंत खडा पहारा देणार आहेत. ही रात्र आणि उद्याचा दिवस निकालाला कलाटणी देणारा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.