पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोमवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट मशीन हाताळण्याचे पहिले प्रशिक्षण मतदान अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण दोन सत्रामध्ये देण्यात आले. त्यामध्ये दीड हजार जणांनी सहभाग घेतला. पिंपरी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी संबंधित प्रशिक्षणाचे सादरीकरण केले. ईव्हीएम मशीन ताब्यात मिळाल्यापासूनचे सर्व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मतमोजणीच्या वेळी कसे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात आले.