निवडणुकीसाठी सातशे पीएमपी, सहाशे एस.टी

पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून 600 एसटी आणि 701 पीएमपी बसची मागणी केली आहे. यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील भोसरी, पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 264 पीएमपी बसची निवडणूक आयोगाने मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, पोलीस कर्मचारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रावर वेळेत पोहचविण्यासाठी बसेसची मागणी करण्यात आली आहे. मतदानाच्या आधी 20 तारखेला सायंकाळपर्यत या बसद्वारे संबंधित मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य पोहचविले जाणार आहे. तसेच, मतदान झाल्यानंतर 21 तारखेला सायंकाळच्या सुमारास मतमोजणी केंद्रावरील साहित्य स्ट्रॉग रुममध्ये पोहचविण्यात येणार आहे.

निवडणूक काळात मतदानासाठी गाड्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाणार असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे एसटी व पीएमपीच्या अधिकाऱ्यांने सांगितले. पिंपरीसाठी- 76 बसेस, भोसरीसाठी 70 मोठ्या व 20 मिडी अशा एकूण 90 बस तर, चिंचवड मतदारसंघात 13 मिडी व 85 मोठ्या अशा एकूण 98 बस तर, एकूण 264 बसची मागणी निवडणूक आयोगाकडून मागणी करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून 701 बसेसची मागणी करण्यात आली आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. ह्या बस दोन दिवस निवडणुकीच्या कामासाठी देण्यात येणार आहेत. यामध्ये काही मिडी व मोठ्या बसेसचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.