“बी’ फॉर्मवर नावच नाही : निर्णयाविरुद्ध कांबळे जाणार उच्च न्यायालयात
पिंपरी – पिंपरी विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किसन कांबळे यांच्यासह चार उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान विविध कारणास्तव बाद झाले. मनसेकडून कांबळे यांना देण्यात आलेल्या “ए'”बी’ फॉर्मपैकी “बी’ फॉर्मवर उमेदवाराचे नाव नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. दरम्यान, कांबळे यांनी सांगितले की, या निकालाविरूद्ध सोमवारी (दि. 7) ते मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
पिंपरी विधानसभेसाठी एकूण 35 उमेदवारांनी शुक्रवारपर्यंत 51 अर्ज दाखल केले होते. चार उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता 31 उमेदवार राहिले आहेत. सोमवारी (ता. 7) उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्या दिवशी किती उमेदवार अर्ज मागे घेतात, त्यावर निवडणूक रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहतात, हे स्पष्ट होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल म्हणाल्या, “”सुलक्षणा शिलवंत-धर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एबी फॉर्म असल्याचा अर्ज उशीरा दाखल झाला. त्यामुळे तत्पूर्वी एबी फॉर्म भरलेल्या अण्णा बनसोडे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्राप्त झालेला “ए'”बी’ फॉर्म ग्राह्य धरण्यात आला. मात्र, धर यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला.
मनसेचे उमेदवार किसन कांबळे यांच्या “बी’ फॉर्मवर उमेदवाराचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरला. जनता पार्टीचे डॉ. अभिजित भालशंकर यांनी दहापैकी दोनच प्रस्तावक दिले. तर, वैशाली देठे यांनी दहापैकी एकच प्रस्तावक दिला. जनहित लोकशाही पार्टीचे अशोक आल्हाट यांनी शपथ घेतलेली नव्हती. तसेच, सकाळी अकरापर्यंत त्याचे प्रमाणपत्रही सादर केले नाही. त्यामुळे त्यांचेही अर्ज बाद ठरले.”
वेळेचे गणित बांधून खेळी –
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरुवातीला सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अण्णा बनसोडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची भूमिका गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने आयत्या वेळी खेळी करीत त्यांना पक्षाचा “ए'”बी’ फॉर्म देऊ केला. वेळेचे गणित साधत शुक्रवारी सकाळी 11:01 मिनिटांनी बनसोडे यांनी अर्ज भरला. तर, दुपारी 12:15 वाजता सुलक्षणा शिलवंत-धर यांचा अर्ज दाखल झाला. पहिला “ए'”बी’ फॉर्म बनसोडे यांचा गेल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरले. तर, शिलवंत-धर यांचा अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आला.
अर्ज बाद ठरलेले उमेदवार –
- किसान कांबळे (मनसे)
- अभिजित भालशंकर (जनत पार्टी)
- अशोक आल्हाट ( जनहित पार्टी)
- वैशाली देठे (अपक्ष)