प्रचार पोहचला शिगेला

फक्त 48 तास शिल्लक : रॅलीद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर

पिंपरी – शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचारासाठी केवळ 48 तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सभा, पदयात्रा, बैठका आदींचा सपाटा लावला आहे. त्याशिवाय, मतदारांच्या वैयक्‍तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत मतदारांशी संपर्क साधला जात आहे. पुढील दोन दिवसांमध्ये प्रामुख्याने मतदारसंघात रॅली काढून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी 4 तारखेला उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर, 5 तारखेला अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. तर, 7 तारखेला अर्ज माघारीनंतर कोणत्या मतदारसंघात कोणते प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत, याचे चित्र स्पष्ट झाले. तसेच, खऱ्या अर्थाने प्रचाराला देखील तेव्हापासूनच सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, खासदार अमोल कोल्हे यांच्या सभांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पहिल्याच टप्प्यात फडणवीस, ठाकरे यांच्या सभा झाल्या. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची सभा काही प्रमाणात चर्चेत आली. त्यानंतर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांच्या सभा होऊ शकल्या नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीनपैकी दोन मतदारसंघात पुरस्कृत उमेदवार दिलेले आहेत. त्यांच्या तीनही उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक सभा झाली. दरम्यान, खासदार कोल्हे यांनी शेवटच्या टप्प्यात सभा घेऊन तिन्ही मतदारसंघ ढवळून काढले.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात झालेली प्रकाश आंबेडकर यांची सभा महत्त्वपूर्ण ठरली. तिन्ही मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीतील बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध आव्हान निर्माण केले होते. ही बंडखोरी शमविण्यात आघाडी आणि युतीचा बराच वेळ गेला. तथापि, पुरस्कृत उमेदवारांमुळे राजकीय पटलावर रंगणाऱ्या या नाट्याचा प्रचारावरही तसाच परिणाम झाला.

उमेदवारांनी विविध संघटनांची पाठिंबा पत्रके मिळविणे, पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेठी, बैठका यावर विशेष भर दिला. तर, आता शेवटच्या दोन दिवसांमध्ये प्रामुख्याने मतदारसंघात रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर – 
प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी देखील फेसबूक, व्हॉट्‌सऍपचा पुरेपूर वापर केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. नेत्यांच्या सभा, बैठका, पदयात्रा आदींच्या व्हिडीओ क्‍लीप, फोटो आदींच्या माध्यमातून उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचार करताना दिसले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.