मतदारांपर्यंत पोहोचताना होतेयं दमछाक

प्रचाराला उरले अवघे पाच दिवस : उमेदवार, कार्यकर्त्यांची धावपळ सुरूचउमेदवार, कार्यकर्त्यांची धावपळ सुरूच

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून उमेदवाराचा सुरू होणारा प्रचार रात्री दहा वाजेपर्यंत अविरतपणे सुरू असल्याचे दिसत आहे. प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळाल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. काही उमेदवार आजूनही निम्मा मतदारसंघ देखील पूर्ण करू शकले नसल्याचे धावपळ वाढली आहे.

शहरामधील पिंपरी, चिंचवड, भोसरी व शहरालगतच्या मावळ विधानसभा मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ मतदारसंघातही अनेक गावात उमेदवार अद्याप पोहचले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता शहरी भागासह ग्रामीण भागातील वाडी-तांडा तसेच डोंगराळ भागाचाही समावेश आहे. यामुळे सर्व मतदारांपर्यंत पोहचणे अवघड होत आहे. यामुळे उमेदवारांची प्रत्येक गावातील मुख्य कार्यकर्त्यांवरच भिस्त आहे.

चिंचवडमध्ये मोठी कसरत – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण 13 लाख 618 मतदार आहेत. तर शहरालगतच्या मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 3 लाख 45 हजार 400 मतदार आहेत. या चारही शहरी भागातील मतदारसंघाचा विचार केला तर पिंपरी मतदारसंघ हा चिंचवड व भोसरी मतदारसंघाच्या तुलनेत सोपा आहे. या भागातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. तरीही काही ठिकाणी अद्याप उमेदवार व त्यांचे समर्थक पोहचलेले नाहीत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये शहरातील अनेक मोठ्या भागांचा समावेश असून या मतदारसंघामध्ये बहुतांश नोकरदारवर्ग राहत असल्याने उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, या मतदारसंघात उमेदवारांनी प्रचार रॅली, बैठका आणि पदयात्रेतून शक्तीप्रदर्शन करीत मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

भोसरीत बैठकांवर भर – तर कामगारांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या भोसरी मतदारसंघातही बहुतांश बाहेरगावातून राहिलेले तसेच कामगार वर्ग मतदार आहे. त्यामुळे, या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच उमेदवार वेगवेगळ्या क्‍लुप्त्या लढत असल्याचे दिसत आहे. भोसरी मधील विविध भागामध्ये पोहचताना उमेदवारांना संपूर्ण दिवस द्यावा लागत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच हा मतदारसंघही मोठा असल्याने वेगवेगळ्या भागांमध्ये बैठका घेण्यावर आणि जास्तीत-जास्त नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. या मतदारसंघात निवडणुकीसाठी वेगळ्याच प्रकारचे नियोजन केले असल्याचे पहायला मिळत आहे.

चिन्ह पोहचविणे मोठे आव्हान – पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ विधानसभा मतदारसंघाचा विचार केला पिंपरी वगळता इतर तिन्ही मतदारसंघात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. चिंचवड आणि भोसरी या दोन मोठ्या मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध अपक्ष असे चित्र आहे. परंतु मुख्य अपक्ष उमेदवारांना राजकीय पक्षांचे पाठबळ मिळाले असले तरी निवडणूक चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. तसेच अपक्ष व इतर पक्षांचेही उमेदवार रिंगणात उतरले असून आपल्या क्षमतेनुसार जोर लावत आहेत. त्यांच्यासमोर आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविणे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.