पिंपरी – विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी-चिंचवड शहरात कॉंग्रेस पक्षाला एकही मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी व पुढील रणनिती ठरविण्यासाठी रविवारी (दि. 6) आकुर्डी येथे बैठक आयोजित केली आहे.
आकुर्डी प्राधिकरणातील हरिदास नायर यांच्या कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता ही बैठक होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, पिंपरी, चिंचवड किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघापैकी एक जागा कॉंग्रेससाठी सोडली जावी, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे केली होती. मात्र, आघाडीत झालेल्या वाटपानुसार शहरात एकही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हटवादी भूमिकेमुळे कॉंग्रेसला मिळाली नाही आणि राष्ट्रवादीचाही अधिकृत उमेदवार केवळ एकाच मतदारसंघात आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यास कोणीही इच्छुक नसल्यामुळे तेथे आघाडीच्या वतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. किमान भोसरी विधानसभेची तरी जागा कॉंग्रेसला मिळायला हवी होती, असे साठे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या या भावना विचारात घेऊन याबाबत वरिष्ठांशी समन्वय साधण्यात आला आहे. वरिष्ठांचे म्हणणे सांगण्यासाठी व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे सचिन साठे यांनी सांगितले.