रणसंग्राम : बाळा भेगडेंसह दोघांना 48 तासांत खुलासा करण्याचे आदेश
पिंपरी – मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसेचे उमेदवार सुनील शेळके आणि भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांनी पहिल्या टप्प्यात सादर केलेल्या खर्चात कमालीची तफावत आढळली. त्यानुसार निवडणूक आयोगाने शनिवारी (दि. 12) शेळके आणि भेगडे यांना नोटिसा बजावून त्यांना 48 तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या 7 उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतची पहिली तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च) आणि प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. विधानसभेच्या प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक उमेदवाराला 35 लाखांची मर्यादा दिली आहे. या मर्यादेतच उमेदवारांना आपला खर्च करायचा आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या मर्यादेत खर्च बसविण्यासाठी उमेदवारांकडे असलेल्या आर्थिक तज्ज्ञांचे पथकाला कसरत करावी लागत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या दिवसांपासून 7 ऑक्टोबरपर्यंतच्या खर्चाचा हिशोब उमेदवार दैनंदिन हिशोब नोंदवही मांडण्यात येत आहे. तसेच उमेदवारांवर “वॉच’ ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये व्हिडीओ सर्व्हिस टीम (व्हीएसटी) आहे. हे पथक प्रत्येक उमेदवाराच्या सभा व प्रचाराचे चित्रीकरण करीत सभा, रॅली, दौरे, गावभेटीवर लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची उलट तपासणी निवडणूक आयोगाच्या यंत्रणा (एसओआर) करीत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शेळके आणि भाजपचे उमेदवार भेगडे यांनी पहिल्या टप्प्यातील खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.
मावळात खर्चामध्ये सुनील शेळके आघाडीवर –
शेळके यांचा 1 लाख 41 हजार 180 रुपये, तर बाळा भेगडे यांचा 1 लाख 31 हजार 780 रुपये एवढा खर्च नोंदविला आहे. प्रत्यक्षात “एसओआर’कडून दोघांच्याही खर्चामध्ये तफावत दिसून आली. सुनील शेळके यांच्या दैनंदिन हिशोब नोंदवहीत 1 लाख 41 हजार 180 रुपये खर्च दाखविण्यात आला असला तरी प्रशासनाच्या निरीक्षणातून तो 5 लाख 98 हजार 474 हजार रुपये खर्च निदर्शनास आला आहे. तर बाळा भेगडे यांचा 7 ऑक्टोबरपर्यंतचा खर्च 1 लाख 31 हजार 780 असल्याची नोंद आहे, मात्र निवडणूक आयोगाच्या अभिरुप निरीक्षण नोंदवहीमध्ये 10 लाख 78 हजार 178 रुपये निदर्शनास आले आहेत.
पाच उमेदवारांचे खर्च 30 हजारांत –
याशिवाय सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्या खर्चामध्ये तफावत आढळली असली तरी अन्य पाच उमेदवारांनी सादर केलेले खर्च कमी आहेत. बहुजन समाज पार्टीच्या मंदाकिनी भोसले, वंचित बहुजन आघाडीचे रमेश ओव्हाळ, अपक्ष ऍड. खंडूजी तिकोणे, धर्मपाल तंतरपाळे, मुकेश अगरवाल या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे कोणत्याही स्वरुपाची परवानगी घेतली नाही, त्यामुळे त्यांच्या खर्च त्यांनी सादर केलेल्या नोंदीनुसार दिसून येत आहे, असे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी सादर केलेला खर्च –
पुढील सात दिवस प्रचाराचे अन् खर्चाचेही –
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा जोर चढला आहे. प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक विभागानेही खर्चाचा ताळमेळ लावणे सुरू केले आहे. उमेदवारांना तीन टप्प्यात निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. पहिला टप्पा गुरुवारी (दि. 10) होता. हिशोबाच्या टिपणीसाठी देण्यात आलेल्या नोंदवह्यांची शुुक्रवारपर्यंत (दि. 11) रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. खर्चाची तपासणी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला हे उघड झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची तपासणी 15 ऑक्टोबरपर्यंत आणि तिसऱ्या टप्पा आणि खर्चाची अंतिम तपासणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवस प्रचाराचे आणि खर्चाचे असणार आहेत, ही बाबही अधोरेखित झाली आहे.