मजुरांचा पुढाऱ्यांवर अविश्वास : सांगतात जास्त आणि देतात कमी
पिंपरी – सध्या सर्वत्र निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसत आहे. आता प्रचारही शेवटच्या टप्प्यात आल्याने शहरात प्रचार सभा, रॅली मोठ्या प्रमाणात निघत आहेत. सभा, रॅली हे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी सर्वात महत्वाच्या ठरत असतात. मात्र, सध्याच्या राजकीय वातावरणात बहुतांश राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात वानवा दिसत आहे. त्यामुळे, प्रचार सभा आणि रॅलीला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक जमवण्याचा फंडा उमेदवारांनी अंमलात आणला आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी मजुरांची देखील फसवणूक केल्याने अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने आता मजुरांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
जशी-जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसे-तसे निवडणुकीला चांगलाच रंग चढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. सर्वच उमेदवार शहर तसेच उपनगर भागात जोर लावून प्रचार करीत आहेत. दररोज एका भागात सभा, रॅलीचे आयोजन केले जात आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची वनवा असल्याने असे उमेदवारांना तोडक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच प्रचार करावा लागत आहे. कमी कार्यकर्ते असल्याने मतदारांवर प्रभाव पडत नाही, त्यामुळे अनेकांनी शहरातील विविध मजूर अड्ड्यावरुन बांधकाम मजूर, तसेच कामावर गुजरान करणाऱ्या कामगारांकडे राजकीय लोकांनी आपला मोर्चा वळविला आहे.
त्यांना दिवसभर प्रचारात सक्रिय करुन प्रचाराची ऑफर देत आहेत. त्यासाठी दिवसाला 500 रुपये हजरी देऊ असे सांगितले जात आहे. त्यामुळे, सुरुवातीच्या प्रचाराच्या टप्प्यामध्ये अनेक मजूर प्रचारालाही लागले होते. मात्र, प्रचार संपल्यानंतर उमेदवारांच्या समर्थकांकडून प्रत्यक्षात हातात 200 ते 300 रुपयेच टेकवल्याचे मजूर सांगत आहेत.
अनेक मजुुरांना प्रचारासाठी नेल्यानंतर पुढारी या कामगारातील एकाच्या हातावर रक्कम टेकवत असतात, त्यामुळे कोणाला किती रोजगार मिळतो याचे गणित लागत नाही? त्यामुळे, प्रचार नको आणि वादही नको अशी भूमिका अनेक मजुरांनी घेतली असल्याचे दिसत आहे. प्रचार झाल्यानंतर उमेदवारांकडून अपेक्षीत मजुरी दिली जात नसल्याने आता अनेक मजुरांनीही राजकीय प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी गर्दी जमविताना नाकीनऊ येत असल्याचे दिसत आहे.
यंदा चित्र वेगळे –
दरवेळेस निवडणुकीच्या काळात बांधकाम क्षेत्रातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात प्रचारात वापरला जातो. यामुळे बांधकाम क्षेत्राचे काम मंदावते. शहरातील बहुतेक मजूर अड्ड्यावरुन सकाळीच मजुरांना नेते मंडळींचे कार्यकर्ते घेऊन जात असतात. बांधकाम व्यावसायिकांची दर निवडणुकीला यामुळे चांगलीच तारांबळ होत असे. यावर्षी मात्र सुरुवातीचे काही दिवस मजूर प्रचाराला गेल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाकडे आपला मोर्चा वळविला आहे. बांधकाम क्षेत्रात मिळणारी मजुरी आणि प्रचारातून मिळणारे पैसे यात बरीच तफावत असल्याने यंदा वेगळे चित्र दिसत आहे.