लहान मुलांपासून थोरा मोठ्यांच्या ओठावर प्रचारगीते
पिंपरी – प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले आहे. यामुळे सर्वच उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, प्रचार वाहनाद्वारे मनोरंजनात्मक व पक्षाच्या गाण्यांच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, शहरातील सर्वच रस्त्यावर फिरणाऱ्या प्रचाराच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. तर, वाढत्या आवाजामुळे सर्वत्र गोंधळ होत असल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे सर्वच उमेदवार मोठ्या जोराने प्रचार करतांना दिसत आहेत. मात्र, याचा नागरिकांना त्रास देखील होत आहे. सातत्याने लाऊडस्पीकर लाऊन फिंरत असलेली वाहने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ही 170 वाहने इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत की, लहान मुलांना देखील वेगवेगळ्या पक्षांची आणि उमेदवारांची प्रचारगीते तोंडपाठ झाली आहेत.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध पद्धतीने त्यांना आकर्षित करण्यात कुठलीच कसर ठेवण्यात येत नाही. यात, आवाजांची मर्यादा ओलांडली जात आहे. मात्र, यावर निवडणूक आयोगाकडून कुठलीही कारवाई होतांना दिसत नसल्याने फावते आहे. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत असणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात-72 वाहने, चिंचवड विधानसभा मतदारसंघात-41 व भोसरी विधानसभा मतदारसंघात-57 वाहने असे एकूण 170 वाहने प्रचारासाठी वापरण्यात येत आहेत. यात, सर्वाधिक वाहने पिंपरी मतदार संघात असल्याने व आधीच गजबजलेला असलेला पिंपरी मतदारसंघात वाहतूक कोंडी बरोबरच आवाजांच्या गोंगाट कमालीचा वाढला आहे.