विधानसभेच्या मैदानात ग्रामपंचायतींची मशागत

पूर्व हवेली तालुक्‍यात आगामी निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांचा खटाटोप : अस्तित्वाची झलक

सोरतापवाडी – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लवकरच येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार झाला आहे. सत्ताधारीविरुद्ध विरोधक असे समीकरण तयार झाले आहे. यात कोणाचे पारडे जड होणार, यावर भविष्यातील राजकीय गणिते ठरणार आहेत.

शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, उरूळी कांचन, टिळेकरवाडी आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार ग्रामपंचायत डोळ्यासमोर ठेवून केला आहे. कधी नव्हे एवढा विधानसभेचा प्रचार गावपातळीवर करण्यात आला आहे.

गावातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सकाळी व संध्याकाळी एकत्र येऊन गाव अन्‌ गाव पिंजून काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप- शिवसेना यांच्या वतीने अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावातून प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येकांनी आपलाच विजय निश्‍चित असल्याचे घोषित केले आहे. मात्र, मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत”दान’ टाकणार, हे चार दिवसांनी समजणार आहे.

विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी अशाच प्रकारे भविष्यातील ग्रामपंचायत निवडणूक लक्षात ठेऊन राजकीय व्यूहरचना तयार करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातही स्थानिक मुद्दे पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत. यामध्ये हवेलीतील ज्वलंत प्रश्‍न असलेला यशवंत सहकरी साखर कारखाना अग्रभागी आहे. यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याच्यावर ग्रामपंचायतीचे आखाडे आखण्यात येणार आहे. पूर्व हवेली तालुक्‍यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय मशागत करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी एकाच कामात दोन कामे साधून घेतली आहेत.

गावपातळीवर राजकीय मोर्चेबांधणी – 
पूर्व हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, उरूळी कांचन, टिळेकरवाडी आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी दोन्ही नेत्यांची कास धरीत आपल्यापरीने राजकीय मशागत सुरू केली आहे. त्याचा भविष्यात आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लाभ उठवता येईल, असा कयास स्थानिक नेते लावत आहेत. सध्या प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी मिळत असल्यामुळे अजून आपण कोणत्या प्रभागात कमी पडत आहोत, यावरून आगामी चार महिन्यांत डागडुजी करता येणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना विधानसभेची रंगीत तालीमच वाटू लागली आहे.

सधन ग्रामपंचायती लक्षवेधी – पूर्व हवेलीतील सर्वात मोठ्या असणाऱ्या गावांत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ समाप्तीच्या वाटेवर आहे. आता थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्यामुळे ही मोठी दोन्ही पक्षांसाठी निणार्यक ठरणार आहेत. त्यामुळे गावकी -भावकीचा तिढा या निवडणुकीतून प्रबळ ठरला आहे. सगेसोयरे, नातेवाईक, मित्र परिवारांची जुळणी लाऊन मतांची बेरीज जुळविली जात आहे. त्याचा परिणाम मतांच्या टक्‍केवारीवर होणार आहे. सधन ग्रामपंचायतींचा कारभार आपल्याच हातात ठेवण्यासाठी गावपातळीवरील स्थानिक नेत्यांनी कंबर कसून प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे गावपातळीवर राजकीय मोर्चेबांधणी आगामी ग्रामपंचायतींची नांदी ठरत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)