Vidhansabha Election । लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीकडून दणका बसला. महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिला. सांगलीचे बंडखोर खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीतील खासदारांची संख्या 31 वर पोहोचली.
आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राज्याच्या भावी मुख्यमंत्री नेमका कुठल्या आघाडीच्या होणार यावरून चर्चा रंगली आहे. दोन्ही आघाडीतील पक्षातील नेत्यांकडून अनेक नावांची चर्चा होत आहे. अशातच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असणार या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिल आहे.
संजय राऊत म्हणाले,’राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे आगामी काळात समजेल. ते सांगण्याची ही जागा नाही. आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग तो सांगू. सर्व निर्णय एकत्र बसून घेतले जातील. फार ओढाताण करायची नाही हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं आहे. कारण, महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचं आहे. असेही राऊत म्हणाले.
दरम्यान,राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. सहा पक्षांत विभागल्या गेलेल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीसाठी आपल्या नेत्याचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून असावा याची ओढ लागली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती कडून नेमकं मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.