लक्ष्मण जगताप, राहुल कलाटे आणि मोरेश्वर भोंडवेंनीही नेला अर्ज
पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सोमवारी पितृपक्ष संपल्यानंतर उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड पहायला मिळाली. आज दिवसभरात 15 उमेदवारांनी 39 अर्ज नेले असून अत्तापर्यंत 24 जणांनी 54 अर्ज नेले आहेत. अद्याप एकाही उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला नाही. सोमवारी विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह मागील वेळी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे, जर शिवसेना व भाजपची युती झाली तर राहुल कलाटे यांची भूमिका काय? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भाऊसाहेब भोईर यांनी देखील अर्ज नेले आहेत. यामुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत अधिक दिसत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवशी केवळ 9 इच्छुकांनी 15 अर्ज विकत नेले होते. चिंचवड मतदारसंघात आज विद्यमान आमदारांसह मातब्बरांनी आपले उमेदवारी अर्ज नेल्याचे पहायला मिळाले. विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी चार अर्ज नेले आहेत. तसेच चिंचवड मतदारसंघातूनच महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनीही चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. शिवसेना व भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असताना राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज नेल्यामुळे चिंचवड मतदारसंघात बंडखोरी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली तर ती भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते. या शिवाय राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही 4 अर्ज विकत घेतले आहेत.
या शिवाय शशिकांत बापू निकाळजे, मिलिंद राजे भोसले, अमोल अरुण देवकुले, एकनाथ नामदेव जगताप, राजेंद्र मारुती काटे, महावीर उर्फ अजित प्रकाश संचेती या सहा जणांनी प्रत्येकी एक अर्ज विकत घेतले. त्यासोबतच राजेंद्र विनायक पारधे यांनी, जावेद शेख, शिवाजी तानाजी धोंडे, चिंतामणी आंनदराव सोंडकर या इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज नेले. आज दिवभरात चिंचवड मतदारसंघामध्ये 15 जणांनी 39 उमेदवारी अर्ज
नेले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन ते चार पदाधिकाऱ्यांनी अर्ज नेले असल्याने नक्की उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे, तसेच पक्षाकडून अद्याप अधिकृत रित्या उमेदवारांची घोषणा न झाल्याने इच्छुक आणि कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. अर्ज भरण्यास अवघे चार दिवस उरलेले असताना आणि यंदा प्रचारासाठी जास्त वेळ मिळणार नसल्याने पक्षाकडून उमेदवाराची घोषणा होण्याची वाट पाहिली जात आहे.