विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी ताकदीने उतरणार

चंद्रकांत खंडाईत : वाई येथे सोमवारी मेळाव्याचे आयोजन
सातारा –
लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत वंचित समूहाला एकत्रित करून आघाडीची स्थापना करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपासून वंचित समुहाला लोकशाही आपली वाटू लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.

आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमला विरोध करून बॅंलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी लवकरच सातारा जिल्ह्यातही आंदोलन उभारण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडी सर्व सामान्य जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार व सुरक्षा या विषयाची हमी देऊन व त्याबाबत जनजागृती करून जनतेच्या मूलभूत विकासाच्या बाजूने विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये आठ विविध समुहातील प्रतिनिधींना संधी देऊन एकसंघपणे निवडणूक लढविण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवार, दि.10 जून रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सातारा यांच्यावतीने वाई विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या मतदारांनी स्वाभिमानाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान दिले. त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी वाई शहरातील श्री कृष्णसो मंगल कार्यालय, मधली आळी वाई येथे सकाळी 11.30 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांगली लोकसभेचे तडफदार उमेदवार गोपीचंद पडळकर, माढा मतदारघाचे उमेदवार ऍड. विजयराव मोरे, सातारा मतदारसंघाचे उमेदवार सहदेव ऐवळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष पार्थ पोळके व राज्य प्रवक्ते सचिन माळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खंडाईत यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.