विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला

19 ऑगस्टला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी : जिल्हाधिकारी द्विवेदी यांची माहिती

नगर – जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा बिगूल वाजला असून त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यांद्याचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार येत्या महिनाभरात मतदार यादी अपडेट करून अंतिम यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, तहसीलदार हेमा बडे, तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी ज्या मतदारांचे वय अठरा वर्षे पूर्ण आहे, परंतु त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी करून निर्दोष अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सोमवारी (दि.15) या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली आहे.

त्यावर दावे, हरकती स्वीकारायच्या आहेत. महिनाभरात चार दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. त्यानंतर दाखल दावे, हरकती निकाली काढून उपजिल्हा निवडणूक अधिकारी किंवा यादी निरीक्षकांकडून मतदार यादीची विशेष तपासणी होईल. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हीच यादी विधानसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात एकूण 34 लाख 38 हजार 551 प्रारूप मतदार आहेत. त्यातील 17 लाख 92 हजार 97 पुरूष तर 16 लाख 46 हजार 293 महिला मतदार आहेत. यासाठी 3 हजार 722 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची कार्यालय (मतदान केंद्र) या ठिकाणी सखोल संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविणार आहेत.

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार

अकोले – 2 लाख 53 हजार 576, संगमनेर- 2 लाख 67 हजार 430, शिर्डी- 2 लाख 6 हजार 837, कोपरगाव-2 लाख 60 हजार 128, श्रीरामपूर- 2 लाख 84 हजार 654, नेवासा-2 लाख 57 हजार 678, शेवगाव-3 लाख 38 हजार 788, राहुरी -2 लाख 88 हजार 127, पारनेर-3 लाख 17 हजार 8, नगर शहर-2 लाख 85 हजार 913, श्रीगोंदा-3 लाख 9 हजार 324, कर्जत-जामखेड-3 लाख 15 हजार 88 असे एकूण जिल्ह्यात 34 लाख 38 हजार 551 मतदार आहेत.

राजकीय पक्षाचे सहकार्य महत्त्वाचे

विधानसभा निवडणुक प्रक्रियासुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षाचे सहकार्य महत्वाचे असून त्यांनी आपले प्रतिनिधींची मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) म्हणून नेमनूक करावी. तसेच त्यांनी तसेच त्यांनी नविन मतदान केंद्र, संवेदनशिल, व अतिसंवेदनशिल मतदान केंद्राबाबत सुचना प्रशासनास करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम

प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 15 जुलै 2019 (प्रसिद्ध झाली), दावे, हरकती स्वीकारणे15 ते 30 जुलै, विशेष मोहिमेचे दिनांक-20, 21, 27, 28 जुलै, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून तपासणी 5 ऑगस्टपर्यंत, दावे व हरकती निकाली काढणे-13 ऑगस्टपर्यंत, डाटाबेस अपडेट, पुरवणी यादी छपाई 16 ऑगस्टपर्यंत व अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 19 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)