बीड : येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठीचे मतदान पार पडणार आहे. यामुळे सगळ्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यंदाची निवडणूक कोणत्याच उमेदवारासाठी सोप्पी नसणार आहे. त्यामध्ये आरक्षण हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. यंदाचा पाडापाडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होणार आहे. यादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पहिल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
कोणाला दिला पाठिंबा
लक्ष्मण हाके यांनी बीडच्या गेवराई मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना पाठिंबा दिला आहे. गेवराई तालुक्यातील गडी येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांची गाडी अडवल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत प्रियंका खेडकर यांना निवडून देण्याचं आवाहन केलं.
बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची ताकद वाढली आहे. लक्ष्मण हाकेंच्या या भूमिकेमुळे गेवराईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे.