Maharashtra Assembly Election 2024 : – राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज करण्याची तारीख उलटून गेली असून आता अर्ज माघार घेण्यासाठी पक्षांकडून नाराज आणि बंडखोर उमेदवारांची मनधरणी सुरू आहेत. त्यातच काही मतदारसंघात नावात साधम्र्य असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले आहे. या डमी उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. यात माढा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. करमाळ्यात तीन संजय शिंदे रिंगणात उतरले आहेत.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या ‘तुतारी’शी साधर्म्य असणाऱ्या ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. आता नावात साधर्म्य असणारे उमेदवार वाढल्याने मतदारांचा संभ्रम देखील वाढणार आहे. माढ्यात अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अभिजीत धनंजय पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला.
याशिवाय अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार माढ्यात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत असताना येथूनच रणजीत मारुती शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली.
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय मामा विठ्ठलराव शिंदे हे अपक्ष उमेदवार असून येथूनच संजय लिंबराज शिंदे आणि संजय वामन शिंदे अशा दोघांनी उमेदवारी दाखल केली आहे. नांदगाव मतदार संघात देखील दोन सुहास कांदे निवडणूक रिंगणात उभे आहेत.