मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातल्या 100 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेने चाचपणी सुरू केली आहे. ही चाचपणी करण्याकरता शिवसेनेने 100 निरीक्षक नेमले आहेत, पण महायुतीमध्ये असूनही शिवसेनेने मित्रपक्षांकडे असलेल्या काही जागांवर निरीक्षकांची नेमणूक केल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून निरीक्षक नेमले गेले आहेत. यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढणार आहे. आता हे कोणते मतदारसंघ आहेत जाणून घेऊयात…
राष्ट्रवादीचे ‘हे’ 8 मतदारसंघ शिवसेनेच्या रडारवर
1. निफाड – दिलीप बनकर
2 दिंडोरी – नरहरी झिरवाळ
3 जुन्नर – अतुल बेनके
4 खेड आळंदी – दिलीप मोहिते
5 शहापूर – दौलत दरोडा
6 अणुशक्तीनगर – नवाब मलिक
7 देवळाली – सरोज अहीरे
8 वसमत – चंद्रकांत नवघरे
या मदतारसंघांमध्ये शिवसेनेकडून निरीक्षक नेमले गेले आहेत. मुख्य म्हणजे भाजपकडे असलेल्या एकाही मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक केली गेली नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप करताना या निरीक्षकांच्या अहवालाचा आधार शिवसेनेकडून घेतला जाणार आहे. यातल्या कोणत्या जागा शिवसेनेने अजिबात सोडू नये, यावरदेखील शिवसेनेचे निरीक्षक काम करत आहेत. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगणार आहे.