पुणे – गोरखपूर एक्स्प्रेसवर चढलेल्या 33 वर्षीय व्यक्तीने उच्च दाबाच्या विद्युत तारेला पकडले. यात त्याला विजेचा जबर झटका बसला. यात तो गंभीर भाजला आहे. शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. जळालेल्या अवस्थेतील तरुण प्लॅटफार्मवर पडल्यानंतर त्याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले.
गोवर्धन मल्ला (वय 33, रा. कटक, ओरिसा) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे रात्री उशिरापर्यंत अस्पष्ट होते. मल्ला हा कामानिमित्त पुण्यात आला होता. तो खेड परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीस असून, तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याच्याकडे विशाखापट्टणमचे तिकीट सापडले आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वाडिया कॉलेजजवळील सिग्नलवर गोरखपूर एक्सप्रेस थांबली असताना गोवर्धन मल्ला ट्रेनच्या छतावर चढला आणि पुढेपर्यंत तेथून चालत आला. ट्रेन प्लॅटफार्म क्रमांक-एक येथे आल्यानंतरही तो ट्रेनवरून चालतच होता. पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने उच्च वीज वाहिनीच्या तारेला हात लावताच मोठा स्फोट झाला. तो उडून प्लॅटफार्म क्रमांक एकवर पडला. घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. ते आल्यानंतर या कृत्याचा उलगडा होऊ शकतो.’
रेल्वेवर चढून तरूणाने हायहोल्टेज तारेला पकडलं, पुण्यातील घटना.. Video pic.twitter.com/Bkm6u57DkO
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 1, 2022