# व्हिडीओ…’ही’ तस्करी पाहून तुम्हीही चक्रावणार

नवी दिल्ली : परदेशातून देशात सोन्याचे दागिने,वस्तू आणि पैशांची तस्करी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येते हे आपल्याला माहिती आहे. परंतु, आता एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पैशांची करण्यात येणारी तस्करी पाहूण तुम्ही नक्‍कीच चक्रावुन जाणार याची खात्री आहे. तब्बल 45 लाखांचे मुल्य असणाऱ्या नोटांची तस्करी करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा व्हिडीओ समोर आला आहे.

भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटे, मटणाच्या तुकड्यांमधून तब्बल 45 लाखांची तस्करी करणाऱ्या व्यक्‍तिस दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. खाद्यपदार्थांच्या आत लपवलेल्या 45 लाख मुल्यांच्या तब्बल 500 कोऱ्या करकरीत नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली मात्र अशाप्रकारे भुईमुगाच्या शेंगातून किंवा शिजवलेल्या मटनातून चलनाची तस्करी करण्याचे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुराद अली या व्यक्‍तिला अटक केली आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. दिल्लीहून तो दुबईला जात होता.

विमानतळावर आल्यानंतर अलीचे वागणे संशयास्पद होते. दुबईला जाणाऱ्या या व्यक्तीकडे शेंगा, बिस्किटे, मटणाचा रस्सा यांसारखे खाद्यपदार्थ काय करत आहे अशी शंका अधिकाऱ्यांना आली. त्यांनी अलीच्या बॅगेची झडती घेतली. प्रत्येक पदार्थ उघडून पाहिल्यावर अत्यंत शिताफीने त्यात परकीय चलन लपवले असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

शेंगदाण्यामधला गर काढून त्यात नोटांची व्यवस्थीत गुंडाळी करून ठेवण्यात आली होती. शेंगदाण्याची टरफलं अत्यंत काळजीपूर्वक चिटकवण्यात आली होती. तस्करीचा हा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावून गेले. अलीने यापूर्वीही परकीय चलनाची तस्करी केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.