लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बाराबंकी महामार्गावर लोकांना चांगलाच तमाशा पाहायला मिळाला. एका महिलेने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला चक्क जोड्याने चोपले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महिला आणि नेत्याने पोलीस ठाण्यांत एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलाला नोकरी देण्याचे आश्वासन देऊन पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तर भाजप नेत्याने हा विरोधकांचा कट असल्याचा दावा केला आहे. महिलेने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा त्याचा आरोप आहे.
त्रिवेदीगंज भाजपचे मंडल अध्यक्ष महामार्गावरून दुचाकीने जात असताना एका महिलेने त्यांना पकडून चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. पैसे परत देण्याची मागणी करत महिलेने भाजप नेत्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली.
@myogiadityanath में मुख्यमंत्री जी ऐ मोटर साइकिल सवार इंसान जिसका नाम उत्तम वर्मा है जनपद बाराबंकी के ब्लाक त्रिवेदीगंज से बीजेपी का मंडल अध्यक्ष है नौकरी दिलाने के नाम पर पीड़ित महिला से 2 लाख रुपये ले रखा है देश भक्त पार्टी के पदाधिकारी घूसखोरी कर रहे कार्यवाही करे, pic.twitter.com/lIinuWOugU
— Shanti Bhushan Singh Varma, (@vweDtZjA9RmR2BO) September 3, 2021
भाजप नेत्याला मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव पियारा असून ती रुकनापूरची रहिवासी आहे. मुलगा मुकेश कुमारला शाळेत नोकरी देतो असे सांगून भाजप नेत्याने आपल्याकडून १ लाख ७५ हजार रुपये घेतले. पण मुलाला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे पैसे परत मागितले असता भाजप नेत्याने ४५ हजार रुपयांचा युनियन बँकेचा धनादेश दिला. धनादेश घेऊन बँकेत गेल्यावर त्या खात्यात पैसेच नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप महिलेने केला.
भिलवल चौकात महिलेने मारहाण करत ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप मंडल अध्यक्ष उत्तम वर्मांनी केला. ‘भिलवल चौकात पियारा आणि त्रिवेदगंजमधील अनेकांनी माझी दुचाकी अडवली. मारहाण आणि आणि दलितांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली तुला अडकवू अशी धमकी त्यांनी दिली. महिलेकडे पैसे उधार घेतले होते. त्यातले १ लाख ३० हजार रोख रकमेच्या स्वरुपात परत केले. बाकीचे पैसे धनादेशाच्या माध्यमातून दिले,’ असा दावा वर्मांनी केला. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.