विशेष: उत्सवातील उत्साह आणि असुरक्षितता!

डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अशावेळी अतिउत्साहाच्या भरात काही विघातक कृत्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राचा भूषणास्पद सांस्कृतिक ठेवा म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात केली. राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मता जतन करून प्रतिकुलतेला तोंड देण्याचे सामर्थ्य समाजशक्‍तीत उभे राहावे ही लोकमान्यांची प्रेरणा होती. प्रारंभीच्या काळात या ज्ञानदेवतेचा उत्सव करणारे कार्यकर्ते सामाजिक भान ठेवून काम करीत असल्यामुळे त्यातूनच अनेकदा राजकीय नेतृत्वसुद्धा उदयाला आले. उत्तम कलावंतांना चांगले व्यासपीठ मिळाले.

देशासमोरच्या प्रश्‍नांची चिकित्सक चर्चा करणारी गणेश मंडळे महाराष्ट्राच्या गावागावात उभी राहिली. सहकुटुंब गणेशोत्सवाचे देखावे पाहणे हा एकेकाळी अत्यंत आनंदाचा भाग असे. आजही देखाव्यांची चढाओढ असते. अनेक कलावंतही काम करीत असतात. कार्यकर्ते रात्रंदिवस राबत असतात. महिना-दीड महिना घरदार न पाहता कार्यकर्त्यांची फळी काम करते. भक्‍तांकडून मिळणारा निधी सामाजिक कार्यात वापरून विधायक काम करणारी मंडळेही आहेत, परंतु त्यांची संख्या कमी झाली आहे.

अर्थकारणाने प्रचंड वेगवान वळण घेतले आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची जागा कंत्राटदारांनी घेतली आहे. भक्‍ती, श्रद्धा, उपासना, ज्ञान, आराधना, पावित्र्य यापेक्षाही भपका आणि प्रसिद्धी अधिक उजळ झाली आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते तन-मन-धनाने राबत असतात. त्यांच्यापेक्षा अपप्रवृत्ती बलवान होत असल्याचे सार्वजनिक मत तयार झाले आहे. शिस्तबद्ध वागणारी मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यापेक्षाही बेशिस्तीची चर्चा अधिक होत आहे. अर्थात, ही गोष्ट स्वाभाविक आहे.

या परिस्थितीत परिवर्तन करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्ते यांचाच हातभार निर्णायक ठरणार आहे. काही अंशी तसे प्रयत्न सुरू असले तरी आर्थिक उन्माद सार्वत्रिक असल्याने त्या संबंधीचा प्रश्‍न अधिक व्यापक आहे. उत्सव जरूर करावेत, परंतु त्यामध्ये नागरी बांधिलकी सांभाळली पाहिजे. जेथे मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात अशा सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवली तरी जर देशाच्या संसदेवर हल्ला होऊ शकतो, तर नागरिकांनी याबाबतची अधिक दक्षता घेणे अपेक्षित आहे.

गणनायकाचे अर्थात गणेशाचे वर्णन सुखकर्ता, विघ्नहर्ता असे केले जाते. असे असले तरी आता बदलत्या परिस्थितीत या मंगलदायी सणाच्या काळात विघ्न येऊ नये याची अधिक काळजी घ्यावी लागते. इतर सण-उत्सव आणि गणेशोत्सव साजरे करण्याच्या बाबतीत काही मूलभूत फरक आहेत. इतरही अनेक सण सार्वजनिक पातळीवर साजरे केले जातात. तरीसुद्धा गणेशोत्सवात होणारी गर्दी, मिरवणुका, त्याला मिळणारा प्रतिसाद यांची इतर सणांशी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे हा उत्सव सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा ठरतो.

समाजकंटक आणि आता अतिरेक्‍यांसाठीसुद्धा या गर्दीचा गैरफायदा उठवून विघातक कृत्य करणे सोयीचे ठरते. दहशतवाद्यांचे हल्ले सांगून होत नसतात कितीही सुरक्षा व्यवस्था ठेवली तरीही संसदेवर हल्ला होऊ शकतो हा अनुभव आहे. गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवात पुणे आणि इतर शहरातसुद्धा दहशतवादी कारवायांचा धोका होता, तो आजही कायम आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरसारख्या शहरात हजारो गणेशोत्सव मंडळे आहेत. हीच स्थिती आता इतर शहरांमध्येही आहे. इतक्‍या मंडळांना संपूर्ण सुरक्षा पुरविणे आणि प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी सर्वकाळ पोलीस बंदोबस्त ठेवणे ही अशक्‍य कोटीतील गोष्ट आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंडळे आणि कार्यकर्त्यांवर महत्त्वाची जबाबदारी पडते.

उत्सवात उत्साह तर हवाच त्याचबरोबर तो अधिकाधिक सुरक्षित कसा असेल, याला सर्वोच्च प्राधान्य हवे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, अजूनही काही अपवाद वगळता या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. विसर्जन मिरवणुकीत तर कर्कश आवाजात स्पिकर्स, धांगडधिंगा आणि अंगविक्षेप केल्या जाणाऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. त्यावेळी सुरक्षेचे भान ना कार्यकर्त्यांना असते ना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना! अशावेळी गर्दीचा फायदा उठवून काही विघातक कृत्य केले गेले तर आश्‍चर्य वाटायला नको.

उत्सवात काळानुसार बदल अपेक्षित असतात. आपला उत्सव बदलला खरा, पण तो नेमका उलट्या दिशेने गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्तम उपयोग करून घेतला पण आता हा उत्सव सार्वजनिक असला तरी त्यात समाजाच्या फारच थोड्या लोकांचे प्रतिनिधित्व असल्याचे पाहायला मिळते. उत्सवाच्या सध्याच्या स्वरूपापासून मोठा वर्ग दूरच राहतो. ही बाबसुद्धा सुरक्षेसाठी योग्य नाही. समाजाचे जेवढे जास्त घटक सहभागी असतील, तेवढा उत्सव सर्वव्यापी होईल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी सर्वचजण घेतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×