मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांच्या बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. दरम्यान, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण आज अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कतरिनाचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये कतरिना बरेच अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. चेहऱ्यावर प्रचंड राग, घामाने भिजलेलं अंग, मोकळे केस असा कतरिनाचा लूक आहे. तसेच समोरच्या व्यक्तीवर वेगाने वार करताना ती दिसत आहे.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करताना ‘टायगर ३’च्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२३ ला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच काही तासांमध्येच १० हजारपेक्षा अधिक लोकांनी याला पसंती दिली आहे. तसेच कतरिनाच्या नव्या लूकचे तिच्या चाहत्यांनी कौतुक देखील केलं आहे.
‘टायगर ३’ हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खान, कतरिना कैफ यांच्याबरोबरच इमरान हाशमी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. धमाकेदार अॅक्शन सीन्ससह ‘टायगर ३’मध्ये सलमान-कतरिनाचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळणार आहे.