कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी शिगेस पोहचलेला तणाव निकालांनंतरही निवळण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. राज्यात तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करत भाजपचे आव्हान मोडीत काढले आहे. मात्र, निकालांनंतर राज्यात काही ठिकाणी हिंसेच्या घटना घडत असल्याची माहिती आहे.
तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत असून अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात येतोय. तृणमूलने मात्र हे सर्व आरोप नाकारले आहेत. अशातच आज पश्चिम बंगाल येथे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ खुद्द व्ही मुरलीधरन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पोस्ट केलाय. यासोबतच त्यांनी ट्विटद्वारे, ” “पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. गाडीच्या काचा फुटल्या. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला झाला. त्यामुळे दौरा आटोपता घेण्यात आला” असा दावा देखील केला आहे.
काय आहे त्या व्हिडीओमध्ये?
व्हिडिओमध्ये काही लोक व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर आणि त्यांच्या ताफ्यातील अन्य गाड्यांवर हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये मुरलीधरन यांच्या गाडीच्याही काचा फुटल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. या प्रकारानंतर अर्ध्या वाटेतूनच मुरलीधरन यांच्या ताफ्याला माघारी परतावं लागलं.
TMC goons attacked my convoy in West Midnapore, broken windows, attacked personal staff. Cutting short my trip. #BengalBurning @BJP4Bengal @BJP4India @narendramodi @JPNadda @AmitShah @DilipGhoshBJP @RahulSinhaBJP pic.twitter.com/b0HKhhx0L1
— V Muraleedharan (@VMBJP) May 6, 2021