मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचा राजीनामा यावर देखील भाष्य केलं. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले.
तसेच, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा याबद्दलही मोठी वक्तव्य केली आहेत. ‘जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं.’ असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. यानंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील एक पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आत्ता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. राजीनाम्याचा विषय माझ्या पुस्तकात सविस्तर मांडला आहे. असं शरद पवार म्हणाले.
तसेच, राज्यपालांची नियुक्ती चुकीची केली जाते याचं भगतसिंग कोश्यारी उदाहण आहे. काही निर्णय अजून व्हायचे आहेत, असं मला वाटतं. राज्यकर्त्यांविरोधात सुप्रीम कोर्टाने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. राज्यपालांची भूमिका चुकीची होती. हे कोर्टाने नमूद केले आहे. घटनात्मक संस्थांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडायची असते. राज्यपालांची भुमिका चुकीची राहीली होती याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे’. असं देखील पवार यावेळी म्हणाले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी छोटेखानी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.