नवी दिल्ली : न्याय मिळण्याचे हक्काचे आणि सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे देशातील न्यायालये. इथे सर्वजण सुरक्षित असतात असे आजपर्यंत वाटत होतं परंतु, दिल्लीच्या साकेत कोर्टात आज एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आवारातच एका महिलेवर एका व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये सदर महिला जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिलाची वेशभूषा केलेल्या एका व्यक्तीने महिलेवर गोळीबार केला. गोळीबार करणारी व्यक्ती ही एक निलंबित वकील असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून या व्यक्तीने महिलेवर हल्ला केला असण्याचा अंदाज व्यक्त पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीने एकूण चार गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आली आहे.
Delhi: A woman has been injured in an incident of firing at Saket court. Four rounds were fired. Police on the spot.
(Warning: Disturbing visuals)
Visuals confirmed by police. pic.twitter.com/vdaUBqZxmp— ANI (@ANI) April 21, 2023
दरम्यान, गोळीबारानंतरचा या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यामध्ये महिलेच्या पोटाला मोठी जखम झाल्याचे दिसत आहे.
काही लोक या महिलेला साकेत कोर्टातून रुग्णालयात उपचारांसाठी नेताना दिसत आहेत. ही महिला चालत या लोकांसमवेत जात असल्याचेही व्हिडीओत दिसत असून त्यावरून महिलेला झालेली जखम जीवघेणी नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिलेची प्रकृती आता स्थिर असून एम्समध्ये तिच्यावर उपचार चालू आहेत. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.