पुणे – देशातील सर्वच घटकांना करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बसू लागला असला, तरी सर्वाधिक दयनीय अवस्था झाली आहे, ती राज्यातील छोट्या-मोठ्या व्यवसायांतील रोजंदारी मजूर, कामगार, हमाल, माथाडी कामगार, छोटे उद्योग-व्यावसायिक, त्यावर अवलंबून असणारे कामगार, घरकामगार या क्षेत्रातील असंघटितवर्गाची.
कमवा आणि खा या वर्गात मोडणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या या लोकांवर करोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे. या लोकांना वाहतूक बंद असल्याने आपल्या गावीही जाता येत नाही.
अशातच पुण्यातील समर्थ पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचा-यांनी पुणे स्टेशन परिसरात अडकून राहिलेल्या प्रवाशांना जेवणाची व्यवस्था करून देत खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे. या कसोटीच्या काळात पोलीसांनी जपलेला मानवतेचा दृष्टीकोन कौतुकास्पद आहे.